मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना | MahaForms
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना काय आहे?
ग्रामीण भागातील शेतकरी, भूमिहीन शेतमजूर आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 26 नोव्हेंबर 2026 पासून महाडीबीटी 2.0 (MahaDBT 2.0) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार असल्याने पात्र अर्जदारांनी लवकरात लवकर अर्ज भरणे आवश्यक आहे.
प्रकल्पनिहाय शासकीय अनुदानाचा तपशील
या योजनेअंतर्गत विविध पशुपालन व्यवसायांसाठी सर्वसाधारण (Open व OBC) प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान थेट बँक खात्यात (DBT) दिले जाते.
| व्यवसायाचा प्रकार | गट / युनिट आकार | सर्वसाधारण प्रवर्ग अनुदान (50%) | SC / ST प्रवर्ग अनुदान (75%) |
|---|---|---|---|
| दुभती गाय / म्हैस पालन | किमान 1 ते कमाल 6 जनावरांचा गट | ₹50 हजार ते ₹4.25 लाख | ₹75 हजार ते ₹6.375 लाख |
| शेळी / मेंढी पालन | 5+1, 10+1 किंवा 50 शेळ्या/मेंढ्या + 5 बोकड | ₹25 हजार ते ₹3 लाख | ₹37.5 हजार ते ₹4.5 लाख |
| कुक्कुटपालन (ब्रॉयलर) | 500, 3,000 किंवा 5,000 पक्षी | ₹1.66 लाख ते ₹9.5 लाख | ₹2.49 लाख ते ₹14.25 लाख |
| कुक्कुटपालन (लेयर) | 5,000 अंडी देणाऱ्या कोंबड्या | ₹15 लाखांपर्यंत | ₹22.5 लाखांपर्यंत |
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता व अटी
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- जमीनधारणेची अट: मोठ्या गटांसाठी (2 ते 6 दुभती जनावरे किंवा मोठा शेळी गट) अर्जदाराच्या नावे किमान 1 एकर स्वतःची जमीन किंवा किमान 5 वर्षांचा नोंदणीकृत भाडेकरार आवश्यक आहे. मात्र, लहान गटांसाठी (1 गाय/म्हैस किंवा 5 शेळ्या + 1 बोकड) जमीनधारणेची अट नसून भूमिहीन शेतमजूरही अर्ज करू शकतात.
- कुक्कुटपालन व्यवसायाच्या मोठ्या युनिटसाठी किमान 20 गुंठे जागा आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे पशुपालन किंवा कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र किंवा 2 वर्षांचा अनुभव असावा. अर्ज करताना प्रमाणपत्र नसल्यास प्रत्यक्ष लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण पूर्ण करण्याचे हमीपत्र देऊनही अर्ज करता येतो.
- योजनेअंतर्गत लहान गटांसाठी महिला लाभार्थ्यांसाठी 50% (मोठ्या गटांसाठी 30%) आणि दिव्यांग व्यक्तींसाठी 5% आरक्षण लागू राहील.
अर्जासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे
टीप: महाडीबीटी 2.0 पोर्टलवर सुरुवातीला अर्ज सादर करताना कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागत नाहीत; मात्र प्राथमिक निवड झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत खालील कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असते:
- महा आयडी (Maha ID) आणि फार्मर आयडी (Farmer ID) (ज्यांच्याकडे जमीन व फार्मर आयडी नाही, असे भूमिहीन शेतमजूर किंवा वनहक्कधारक संबंधित पर्याय निवडून अर्ज करू शकतात).
- आधार कार्ड (मोबाईल क्रमांकाशी संलग्न असलेले) व रेशन कार्ड क्रमांक.
- जमिनीचा चालू 7/12 उतारा व 8-अ उतारा किंवा नोंदणीकृत भाडेकरारनामा (मोठ्या गटांसाठी लागू).
- आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या बँक खात्याचे पासबुक.
- अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील अर्जदारांसाठी सक्षम अधिकाऱ्याचा जातीचा दाखला.
- रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र (किंवा हमीपत्र).
- निवडीनंतरची कागदपत्रे:
पूर्वसंमती आदेश मिळाल्यावर बंधपत्र (Bond)
बंधपत्र नमुना PDF शेळी व मेंढी गट वाटप योजना बंधपत्र नमुना PDF
कुक्कुटपालन योजना बंधपत्र नमुना PDF
ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया (Step-by-Step)
- महा-आयडी (Maha ID) नोंदणी: सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महाडीबीटी 2.0 (MahaDBT 2.0) पोर्टलवर जाऊन उजव्या कोपऱ्यातील Register बटनावर क्लिक करा. आधार नंबर टाकून ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करा. महा-आयडी तयार होण्यासाठी साधारण 24 तास लागतात.
- लॉगिन व प्रोफाइल भरणे: Citizen Login मधून महा-आयडी किंवा आधार नंबर व ओटीपीद्वारे लॉगिन करा. 'योजनेसाठी अर्ज करा' पानावर Animal Husbandry Scheme for Farmer निवडा आणि वैयक्तिक, सामाजिक वर्ग, रेशन कार्ड व जमिनीचा (किंवा भूमिहीन असल्याचा) तपशील भरून प्रोफाइल जतन (Save) करा.
- योजना व घटक निवडणे: 'पात्र योजना' टॅबमध्ये जाऊन मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना निवडा. जनावरांचा प्रकार (गाय/म्हैस, संकरित/देशी) आणि घटक काळजीपूर्वक निवडा (अर्ज सबमिट केल्यानंतर घटक किंवा प्रोफाइल बदलता येत नाही).
- अर्ज सादर करणे: सर्व माहितीचे पूर्वावलोकन (Preview) तपासून अर्ज दाखल करा बटनावर क्लिक करा.
- पुढील टप्पे: अर्जाची प्राथमिक निवड झाल्याचा SMS आल्यावर 10 दिवसांत कागदपत्रे अपलोड करा. पूर्वसंमती मिळाल्यावर बंधपत्र देऊन खरेदी पूर्ण करा आणि बिले व जिओ-टॅग फोटो अपलोड करून अनुदानाचा दावा (Claim) सादर करा.
टीप: या लेखातील माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. अंतिम खात्रीसाठी अधिकृत जाहिरात व मूळ अधिसूचना पाहावी.